दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना खाली पडुन एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वेल्हा तालुक्यातील खानापूर रांजणे-पाबे घाट रस्त्यावरील डोंगरावर घडली. धक्कादायक बाब म्हणजे मित्राचा मृत्यू झाल्याचे समजतात सोबत असलेल्या दोन मित्रांनी तिथेच खड्डा करून मित्राचा मृतदेह त्यात पुरल्याचा प्रकार समोर आला आहे.
बसवराज पुरंत मंगनमनी (वय-२२, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मुळ रा. तुळजापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे (दोघे रा. पाबे, ता. राजगड) या दोघांनी मिळून बसवराज याचा मृतदेह पुरल्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री वेल्हे पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती मृतदेह लागला नाही. त्यामुळेच आता या दोन तरुणांना घटनास्थळी नेण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या विजेच्या टॉवरवर चढून विजेच्या तांब्याच्या तारा चोरी करण्यासाठी मयत बसवराज आणि त्याचे दोन मित्र गेले होते. त्यावेळी बसवराज हा टॉवरवर चढून तारा कापत असताना तो खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या दोन मित्रांनी कोणालाही या घटनेची माहिती न देता त्याचा मृतदेह पाबे घाटात आणून मंदिरासमोरच्या डोंगरात खड्डा खोदून पुरला. 23 जुलै रोजी बसवराज यांच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता सदर माहिती त्यांच्या हाती लागली.