Pune News

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

828 0

पुणे : “आजच्या पिढीला 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. आजच्या तरुण पिढीने कल्पक बनले पाहिजे, जोखीम पत्करली पाहिजे आणि स्वतःचे उद्योग आणि स्टार्टअप तयार केले पाहिजेत. तसेच देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे,” असे मत राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी व्यक्त केले.

पिरंगुट येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या (पीआयबीएम) 14 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बैस बोलत होते. नागपूर आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉ. भारतभूषण सिंग, विकफिल्ड फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस सचदेवा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी पदके देण्यात आली.

श्री. बैस म्हणाले, ” विद्यार्थ्यांना 2047 पर्यंत भारताला विकसित देशामध्ये बदलण्यासह देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची संधी मिळेल. पूर्वीचे विद्यार्थी चांगले पॅकेज घेऊन परदेशात जात असत. मात्र आता परिस्थिती बदलत असून प्रत्यक्षात विदेशातून देशात उलटे स्थलांतर सुरू झाले आहे. चांद्रयान, जी २०, आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाने आपल्या देशाला आत्मविश्वास दिला आहे. जी २० च्या यशामुळे जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. यातून आपण कितपत फायदा घेतो यावर आपण आपल्या लोकांसाठी संधी कशी निर्माण करू शकतो हे अवलंबून असेल.”

“मी विद्यार्थ्यांना जोखीम घेणारे आणि नवोन्मेषक बनण्याचे आवाहन करीन. स्वतःचे उद्योग आणि स्टार्टअप तयार करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना भरपूर क्षमता विकसित करण्यासाठी मदत करेल. त्याचा विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत फायदा होईल,” असेही श्री. बैस म्हणाले.

पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत म्हणाले, “आमचे राज्य पूर्णत: कुशल बनवण्यासाठी योगदान देणे हे आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली पाहिजे. ध्येय आणि यश मिळवण्यात प्रतिभा आणि कौशल्याव्यतिरिक्त सकारात्मक दृष्टिकोनाचा मोठा वाटा असतो.”

डॉ. मेत्री म्हणाले, “कॉर्पोरेट जगताचा विचार केला तर प्रवास आणि सीमा वेगळ्या असतात. भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी आता गतिमान, स्पर्धात्मक आणि विस्कळीत जगात प्रवेश करतील. पण प्रत्येक अडथळा, संकट अनेक संधी घेऊन येते.” यशाची पंचसूत्री सांगताना डॉ. मेत्री म्हणाले, ” अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रथम नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. मोठी स्वप्ने पाहावीत. भारतीय नीतिमत्ता, मूल्ये सोबत ठेवून जगावे. व्यत्यय बनण्याऐवजी व्यत्यय आणणारे व्हावे आणि तंत्रज्ञानाचा ग्राहक बनण्याऐवजी विकसक व्हावे. नेहमी सक्षम राहावे. सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी कंफर्ट झोन सोडून काम करावे.”

दीक्षांत समारंभाच्या उत्तरार्धात भारताचे शिक्षण राज्यमंत्री श्री.सुभाष सरकार, बिस्लेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँजेलो जॉर्ज आणि जाफा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनियार पटेल यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक हर्षदा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रतिज्ञा दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!