पुणे- पुणे शहरात महिला आणि मुलींवर अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडेच शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच बंडगार्डन परिसरात मुलींवरील अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत.
बंडगार्डन परिसरातील पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील मुलीची एका टोळक्याने मध्यरात्री छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी झालेल्या वादात टोळक्याने तिच्या दोन मित्रांना बेदम मारहाण देखील केली. 20 वर्षीय तरुणाच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी शुभम शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा येथील राजा बहादुर मिल्समधील एका पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. रात्री साडेतीनच्या सुमारास पबच्या पार्किंग परिसरात मैत्रिणीसोबत जात होता. त्यावेळी त्याठिकाणी उभ्या असलेल्या दोन मुलांपैकी एकाने शिट्टी वाजवून मुलीवर अश्लील कमेंट केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी या दोघांनी तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. वाद वाढल्यानंतर दोघा आरोपींनी आणखी 8 ते 10 मुलांना तिथे बोलावलं. आरोपींनी दोघांना लोखंडी चैनने मारहाण करुन जखमी केल. तसंच गळ्यातील चैन आणि पाकिट चोरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत 13 मार्च रोजी पहाटे अडीचच्या सुमारास 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये तरुणी मित्रांसोबत जेवण करुन गप्पा मारत थांबली होती. यावेळी त्यांच्या बाजूला आठ ते दहा व्यक्ती भांडण करत होते. त्यातील आरोपी हा तरुणीच्या जवळ आला. त्याने तिचा डावा हात धरुन जवळ ओढले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. तरुणीच्या मित्राने विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ओहनसिंह सहानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत एमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा वाहकाने विनयभंग केला. फिर्यादी तरुणीची स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत असताना आरोपी गोडगे तिच्या बाजुला थांबला आणि मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. मात्र फिर्यादी तरुणी काहीच न बोलता बाजूलाच उभी राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी तक्रार केली.
दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर आरोपी वाहकाने राग मनात ठेवत तरुणीच्या कंबरेला हात लावला. तक्रारीनुसार, आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.