वाघोली : पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील वाघोली-केसनंद रस्त्यावरील नायरा पेट्रोलपंपासमोर घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुणदेखील गंभीर जखमी झाला आहे.
काय घडले नेमके?
गौरवी रवींद्र जाधव (वय 19, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, मूळगाव – कोल्हापूर) (Gauravi Ravindra Jadhav) असे अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशिषकुमार (Ashish Kumar) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आशिषकुमार व गौरवी हे दोघे दुचाकीवरून जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने हा अपघात झाला.
ही धडक एवढी भीषण होती कि, ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालक लक्ष्मण चिन्नास्वामी (वय 39, रा. कोलवडी) याला अटक करण्यात आली आहे. मृत गौरवीचे एअर होस्टेज बनण्याचे स्वप्न होते ते अधुरेच राहिले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.