पिंपरी- रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातून परतलेल्या चिंचवडमधील तरुणाचा नारायणपूर रस्त्यावरील चिवेवाडी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मैत्रिणीबरोबर देवदर्शन घेऊन घरी येत असताना बुधवारी ( दि . 23 ) रोजी ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्यासोबत असलेली तरुणीही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
किरण ऊर्फ सोन्या अर्जुन कुन्हाडे ( वय 20 , रा . गुरुदत्त कॉलनी क्रमांक चार , वाल्हेकरवाडी, चिंचवड मूळगाव मु.पो. आळे, ता. जुन्नर, जि . पुणे ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मायदेशी आलेला किरण मैत्रिणीबरोबर देवदर्शन घेण्यासाठी गेला होता. देवदर्शन घेऊन परत येत असताना
मैत्रीणीला सहा वाजण्यापूर्वी घरी सोडायचे असल्याने तो वेगात दुचाकी चालवत होता. एका वाहनाला ओलांडून पुढे जात असताना समोरून अचानक वाहन आल्याने त्याला अपघात झाला . या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरणचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली तरुणीही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत .
किरण कुऱ्हाडे हा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. बारावीला 89 टक्के पडलेल्या किरण याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याच्या काकाने प्रयत्नही केले. मात्र वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्याच वर्षासाठी तब्बल एक कोटी 37 लाखांचा खर्च सांगण्यात आला. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या किरणला एवढा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे किरणने रशियात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने तेथील शैक्षणिक संस्थेने ऑनलाइन क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला. किरण हा शिक्षण घेत असलेली संस्था युद्धाच्या बॉर्डरपासून अवघ्या 500 किलोमीटर अंतरावर होती. त्यांच्यासोबत असलेले 10 महाराष्ट्रीयन विद्यार्थी पुन्हा आपल्या घरी आले. मात्र किरण यांना घरी येण्यासाठी पैसे नसल्याने काहीवेळ तो तिथेच थांबला. मात्र रशियासाठी आंतरराष्ट्रीय हद्द बंद करण्याची चर्चा होऊ लागल्याने अखेर त्याच्या वडिलांनी पैसे जमवून त्यास पाठविल्यानंतर तो 16 मार्च रोजी भारतात आला.