पुणे : मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाकरिता विधानसभा मतदारसंघ निहाय साहित्यवाटप केंद्रांवरुन मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण आज झाले असून सर्व मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा मतदारसंघांतर्गत पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान पथकांना मतदान साहित्य वितरण करण्यात आले. प्रारंभी सर्व ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 हजार 566 मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या 7 हजार 698 बॅलेट युनिट, 2 हजार 566 कंट्रोल युनिट आणि 2 हजार 566 व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी सुपूर्द करण्यात आले.
या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच वाहतूक बसेस, जीप तसेच इतर वाहनांवर केंद्र क्रमांक दर्शविण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना वाहनांमध्ये बसवून केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंगला यांनी चिंचवड तसेच पिंपरी येथील साहित्य वितरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विधानसभा मतदारसंघ निहाय संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ
Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही
Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद