पुण्यात दररोज होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आणि दोन दिवसात दोन हत्या झाल्यामुळे खळबळ उडालेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा समोर आली आहे. एक तरुणाला भेटायला बोलवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सागर चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागरला जिवे मारण्याचा उद्देशाने त्याच्यावर दोन तरुणांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा कट दोन महिन्यांपूर्वीच रचला गेला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून सागरशी चॅटिंग करण्यात आले. चॅटींग करणारी मुलगीच आहे असा विचार करून सागर मुलीच्या प्रेमात पडला. त्यामुळेच इतके दिवस चॅटिंग करणाऱ्या मुलीने म्हणजेच आरोपींनी त्याला आज सकाळी एकट्यात भेटायला बोलावले. सागर किरकटवाडी परिसरात पोहोचल्यानंतर त्याच्यावर दोघांनी कोयत्याने वार केले. ज्यामध्ये सागर गंभीर जखमी झाला आहे.
हल्ल्याचं धक्कादायक कारण
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी श्रीनिवास वतसलवार नावाच्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. ज्यांनी श्रीनिवासला मारले त्यांच्यापैकी सागर चव्हाण एक होता. त्यामुळेच मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या तरुणांनी हा मास्टर प्लॅन आखला.