पुण्यनगरी ही गुन्हे नगरी बनत चालली आहे. अशा अनेक घटना पुण्यात घडत आहेत ज्यामुळे पुण्याची संस्कृती आणि अस्मिता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गेल्या तीन दिवसात पुण्यात सलग तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गणेश पेठेतील एका ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून एका दारुड्याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे.
ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विक्रम जोगी विश्वकर्मा (रा. सदाशिव पेठ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या प्रकरणी 60 वर्षे महिलेने प्रस्तावना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चंपा कुदळे असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गणेश पेठ एकटीच राहते. 2 सप्टेंबरला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही महिला घरात एकटी असताना त्यांचा दरवाजा कोणी तरी वाजवला. त्यांना वाटले, त्यांचे पती मुलगी किंवा जावई असतील. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला तेवढ्यात एक दारुडा त्यांच्या घरात घुसला. त्यावर या महिलेने त्याला जाब विचारला. ‘तू कोण आहे रे, इथे कशाला आला, थांब माझ्या जावायाला फोन लावते’, अशी धमकी महिलेने देतात या दारुड्याने महिलेला ढकलून दिले. तिच्या तोंडावर बुक्की मारली. आणि गळा दाबायचा प्रयत्न केला. ही महिला दारुड्याच्या तावडीतून सुटून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा महिलेला ढकलून देत मारहाण केली. तर महिलेला खाली पाडून तिच्या अंगावर बसून उशीने तोंड देखील लावले. त्याचबरोबर तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला.
या सगळ्यात ज्येष्ठ महिलेने आरडा ओरडा केला. त्यावेळी शेजारील नागरिकांनी पोलिसांना फोन केला. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, रा. सदाशिव पेठ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने हे कृत्य नेमके कशासाठी केले याचा शोध पोलीस घेत आहेत.