पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विलीन झालेल्या तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत हुडकोच्या अर्थसाह्याने गृहप्रकल्प राबविण्यात आले होते. मात्र यातील काही लाभार्थ्यांनी सदनिकेबाबत अद्यापही भाडेपट्टा, दस्त प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने संबंधितांनी ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.
संबंधित सदनिकेचे हप्ते विहित मुदतीत परतफेड केल्यानंतर संबंधितांनी भाडेपट्टा, दस्त करून घेणे आवश्यक होते. मात्र काही लाभार्थ्यांनी विहित मुदतीत हप्ते भरलेले नाहीत तसेच भाडेपट्टा, दस्त केले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जमीन व मालमत्ता विभागाशी संपर्क साधून भाडेपट्टा, दस्त पूर्ण करण्याची प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. अशा लाभार्थ्यांच्या मालमत्तेचे पीएमआरडीएमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून मूळ लाभार्थ्यांना नोटीसा देत भाडेपट्टा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संबंधितांनी विहित मुदतीत भाडेपट्टा करून घेणे अपेक्षित असून ते करून न घेणाऱ्या सदनिकाधारकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. यासह सदनिकाधारकांनी संबंधित सदनिका अन्य व्यक्तीस हस्तांतरित केली असल्यास हस्तांतरणाची प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधितांनी याची नोंद घेत भाडेपट्टा, दस्त प्रक्रिया करून घ्यावीत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.