पुणे महापालिका हद्दीत पंधरा वार्ड ऑफिस असून या प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येकी दोन अशा ३० टीम तयार करुन खड्डे बुजविणे आणि वाहतूक नियोजन करा, असे निर्देश केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेला दिले. महापालिक आणि पोलीस यांनी एकत्र काम करावे, असा सल्लाही मोहोळ यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला दिला. शिवाय येत्या काही दिवसांत शहरात एकही रस्त्यात खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरला. त्यावर पुढील ४-५ दिवसांस खड्डे बुजविण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.
पुणे शहरात गेली काही दिवस पावसाचा जोर कायम असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिवाय शहरात ठिकठिकाणी खड्डेही मोठ्या प्रमाणाच झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एकत्रिक बैठक घेतली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासह मा. नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘ पुणे शहरात एकूण १ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते असून खड्डे बुजवण्यात महापालिका कमी पडत आहे. प्रशासनाने यावर काम केलं पाहिजे. शिवाय वार्ड ऑफिसर रस्त्यावर असणे आवश्यक असून वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजेत. या दोन्ही विषयांसंदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असून लोकप्रतिनिधी म्हणून आमचे लक्ष आहे.
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सर्व वॉर्डन रस्त्यावर उतरावेत. शिवाय होम गार्डचे मनुष्यबळही पुरेपुर वापरून वाहतूक सुरुळीत करावी. शिवाय होम गार्डची उपलब्धता पुणे पोलिसांनी करुन द्यावी, अशीही सूचना मोहोळ यांनी बैठकीत केल्या.
‘ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. पण जो कोणी घेत नसेल, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. शिवाय कामात हयगय करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. आम्हाला पुण्यातील रस्ते आणि वाहतूक सुरुळीत झालेली पाहिजे, असेही निर्देश दिल्याचे मोहोळ म्हणाले. शिवाय महापालिका आणि जलसंपदा यात समन्वय कसा राहील? याची काळजी आम्ही घेत आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी आधी मुंबईतील रस्त्यांची स्थिती पाहावी !
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची धुरा वर्षानुवर्षे सांभाळली असून त्यांनी आधी मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती पाहावी. मुंबईपेक्षा पुणे खूप चांगलं आहे, असा टोला मोहोळ यांनी ठाकरे यांना लगावला. पुरानंतर आम्ही सगळे फिल्डवर फिरलो होतो. शिवाय पाणी घरात घुसले तेव्हा आमची सर्व मंडळी मदतीस होती. भारतीय जनता पार्टीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुराच्या पाण्यात होते. शिवाय औषध फवारणी, पाणी, स्वच्छता आणि विद्युत मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता बऱ्यापैकी लोकांचे जनजीवन सुरळीत झाले आहे, हेही मोहोळ यांनी सांगितले.
राजाराम पुलाजवळील उड्डाणपूल लवकरच सेवेत..
राजाराम उड्डाणपुलाजवळ सिंहगड रस्त्यावर साकारलेल्या उड्डाण पुलावर डांबरीचे आवरण व्हायचे राहिले असून पावसाने उघडीप घेतल्यास हे आवरण पूर्ण होईल. डांबरीचे आवरण न करता जर पूल वाहतुकीस सुरु केला तर मोठी अडचण होणार आहे. म्हणूनच ब्रीजच्या कामात राजकारण आणू नये, कारण पूल सुरु करण्यास प्रशासनाचा ग्रीन सिग्नल बाकी अद्यापही बाकी आहे.