काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथे वाघाच्या कातडीची तस्करी करताना आढळलेल्या एका टोळीला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले होते. याच प्रकरणातील एका रहीम पवार नावाच्या आरोपीच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन होता. याच दिवशी एका 4 ते 5 वर्षीय वाघिणीची शिकार करून तिच्या कातडीची तस्करी करत असलेली टोळी वाघिणीच्या कातडी सह आढळून आली होती. याप्रकरणी सिमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी नशिराबाद टोल नाक्याजवळ या टोळीतील 6 जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे प्रकरण वन विभागाकडे सोपवण्यात आले होते.
या टोळीतील सहापैकी चार आरोपी हे मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा तपास काही दिवसांपासून वान विभागाकडून सुरू आहे. तपासासाठी 2 ऑगस्ट रोजी सकाळी वन विभागाचे पथक संशयित आरोपी म्हणून ताब्यात असलेल्या रहिम पवार यांना घेऊन हलखेडा येथे आले होते. तपास कार्य पार पडल्यानंतर हे पथक तिथून निघून गेले. त्यानंतर आपल्या वडिलांना भेटू न दिल्याने नैराश्य आलेल्या सोम रहिम पवार या 14 वर्षीय मुलाने घरासमोर असलेल्या कोंबड्याच्या शेडजवळ गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.