आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज सकाळपासूनच ठीक ठिकाणी दहीहंडीची तयारी सुरू असून दुपारनंतर या दहीहंड्या फोडल्या चालतील. मात्र पुण्यातल्या एका अनोख्या दहीहंडीने आज सगळ्यांचंच लक्ष वेधलं. आज इंद्राणी बालन फाउंडेशन आणि जेधे सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडी साजरी करण्यात आली.
पुण्यातील बालगोपाळांसह ही दहीहंडी साजरी करण्यात आली. या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडी वेळी 100 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ ते दहा किलोमीटर लांब वर चालत शाळेत जावे लागते. त्यामुळेच अशा गरजू विद्यार्थ्यांना आज सायकल वाटप करण्यात आले. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील आणि जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कान्होजी जेधे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना यंदाच्या वर्षी केवळ शंभर सायकल वाटल्या असल्या तरी पुढच्या वर्षी मात्र पाचशे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करू, असा निर्धार उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.