मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

593 0

पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. ही घटना हडपसर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता दिलीप खाटपे (वय 45) असे आरोपी महिलेचे नाव असून याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. याचाच राग मनात भरून ही महिला सोसायटीतील एकच कुत्रा जिवंत ठेवणार नाही असे म्हणुन हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती.

या महिलेने दोन पिलांना काठीने बदडून ठार केले. त्यानंतरही दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. हातात काठी घेऊन फिरत असताना ही महिला अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. कुत्र्याला का मारता अशी विचारणा केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत अरेरावी केली.

कुत्र्याच्या दोन पिल्लाना या महिलेने ठार केल्याचे समजताच सोसायटीमधील एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे श्वानप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हडपसर पोलीस तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!