पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरूनच माननीय नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबवितात. त्याचा समाजाच्या शेवटच्या घटकाला सर्वाधिक लाभ होतो, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
रेम्बो सर्कसच्या सर्व कलाकारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप आ. पाटील यांच्या कोथरूड मधील निवासस्थानी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या सह रेम्बो सर्कसचे कलाकार आणि संचालक उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्यानुसार समाजाच्या शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे. पंडितजींच्या या विचाराला अनुसरूनच माननीय नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या अनेक योजना देशभरात राबवितात.
ते पुढे म्हणाले की, आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड, सर्वांसाठी घर या योजना त्याचाच भाग आहे. ज्यांचा लाभ अनेकांना मिळत असून, यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ई-श्रम कार्डसाठी सर्कसीतील कलाकारांनी आ. पाटील यांचे आभार मानले.