दहीहंडीच्या दिवशी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; हा कोणते रस्ते चालू, कोणते बंद ?
पुणे शहरात 27 तारखेला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पुण्यात दहीहंडी साजरी करणारी अनेक प्रसिद्ध मंडळे आहेत. सर्वच मंडळांची तयारी पूर्ण झाली असून आता ठीक ठिकाणी स्टेज टाकून सजावट सुरू झाली आहे. तर दुसरीकडे गणेश उत्सवानिमित्त चौका चौकात मांडव घालण्यात येत आहेत त्यामुळेच पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी उत्सवाच्या या दिवसात पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी सायंकाळी पाच पासून खालील मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीतील बदल खालील प्रमाणे
बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे जाता येईल.
शिवाजी रोडवरुन स्वारगेटला जाण्याकरीता स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळकरोडने / शास्त्री रोडने जाता येईल.
स.ज्ञगो. बर्वे चौकातून पुणे मनपाकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून पुढे जाता येईल.
पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने पुढे जाता येईल. तसेच सणस पुतळा चौकामधुन सेनादत्त चौकाकडे जाऊन देखील पुढे जाता येणार आहे.
शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक, पवळे चौक, जुनी साततोटी, पोलीस चौकी मार्गे जाता येईल.
सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून पुढे जाता येईल.
गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक दारुवाला पुल येथून बंद करण्यात येईल. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकातील वाहतूक बंद करण्यात येईल. त्यामुळे अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्याचबरोबर रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेच्या विभागाकडून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे बदल दहीहंडीच्या दिवशी पासून दहीहंडी फुटेपर्यंत लागू असणार आहेत.