पुणे :येरवडा शास्त्रीनगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटींच्या प्रकल्प आराखड्यास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकित मंजुर देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीची आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. विधानसभा निवडणूकीपुर्वीच उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ होईल असेही त्यांनी सांगितले.
नगर रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याबाबत माहिती देताना आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, शास्त्रीनगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो. मात्र, पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडले होते, त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मे महिन्यात राष्ट्रीय पुरातत्व विभागाने मे महिन्यात उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला या दोन्ही कामांचा आराखडा करून कामाला सुरवात करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार या दोन्ही कामांचा 97 कोटींचा आराखडा पालिकेच्या एस्टीमेट कमिटीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. बुधवारी झालेल्या बैठकित त्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.
असा होणार उड्डाणपूल व भुयारी मार्ग
शास्त्रीनगर चौकात जो भुयारी मार्ग प्रस्तावित सहा पदरी असणारं आहे. त्यात येरवडयाकडून नगर रस्ता खराडीकडे जाण्यासाठी वाहनांसाठी तीन पदरी मार्ग तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनासाठी भुयारी मार्गाची तीन पदरी प्रस्तावित करण्यात आली आहे. या भुयारी मार्गासाठी 37 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर खराडी, विमाननगरकडून येणाऱ्या वाहनांना गोल्फक्लबकडे जाण्यासाठी दोन पदरी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलासाठी 26 कोटींचा खर्च येणार आहे. याशिवाय चौकातील अन्य कामांसाठी 18 कोटींचा खर्च होणार आहे.
नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते विमाननगरपर्यंत बीआरटी काढल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आता उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामालाही सुरवात होईल. तर लवकरच शिरुर ते रामवाडीपर्यंत दुमजली उड्डाणपुलाचे कामही सुरू होईल. त्यामुळे भविष्यात नगर रस्ता सिग्नल फ्रि होईल. असा विश्वास आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला आहे