पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहे. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्यासह विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुरुडकर झेंडेवाले यांना आकर्षक असा फेटा तयार करण्यास सांगितला. त्यानंतर गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे.
या बाबत अधिक माहिती देत गिरीश मुरुडकर म्हणाले की, आम्ही फेट्याचे २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या कपडयांना करत मॅच होणारा फेटा बनवण्याचं ठरवलं. क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. यासाठी पैठणीचे कापड, जरी आणि ऑस्ट्रेलियन डायमंड असे साहित्य वापरले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलंय.
तर, त्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये शिवमुद्रा बसविली आहे. सूर्यफुलाचं वैशिष्टय असं की, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते,” अशीच थीम घेऊन फेटा तयार केला.