येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता पुण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता ते दिल्लीला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या या पुणे दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर मेट्रोसह विविध विकासकामांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून ते पुणे महानगरपालिकेत पोहोचतील. महापालिकेत साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
दहा मिनिटांच्या या कार्यक्रमानंतर ते गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनची पाहणी करतील. गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशन वरून ते आनंद नगर मेट्रो स्टेशन येथे जाणार आहेत. मेट्रोचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर ते कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला उपस्थिती लावतील.
एमआयटीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
या जाहीर सभेनंतर ते हेलिकॉप्टरने लवळे येथील सिंबोसिस महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते लोहगाव विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत. अवघ्या काही महिन्यात पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा शुभारंभ व काही विकास कामांची उद्घाटने भारतीय जनता पार्टी करणार आहे. त्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.