मुंबई- दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी व्यक्ती मंत्रिपदी कायम आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे. असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. उद्या, गुरुवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा भडीमार केला. महाविकासआघाडीचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात. पण महाविकासआघाडीचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.
मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. आम्ही येत्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहोत असे फडणवीस म्हणाले. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी व्यक्ती मंत्रिपदी कायम आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या कार्यकाळात मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे, हे दुर्दैव आहे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे. सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून ठाकरे सरकारची ओळख निर्माण झालीय, असे फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.