राज्यात विधानसभेचे पडघम वाजलेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यातच आता राज्यात तिसऱ्या आघाडीने जन्म घेतलाय. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी उदयास आली आहे. सर्वांची जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र 11 उमेदवार जाहीरही गेले. हेच प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडी बरोबर जातील अशी चर्चा होती. मात्र आता आंबेडकर हे चौथी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात असल्याचही बोललं जातंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं नेमकं काय चालू आहे ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पाहूया यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट…
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन झाली. युती आणि आघाडीतून बाजूला राहिलेले सगळे पक्ष या तिसऱ्या आघाडीत यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडी हा सध्याचा महत्त्वाचा आणि मोठा पक्ष मानला जात आहे. त्यामुळे वंचितही या आघाडीत सहभागी होईल अशी शक्यता होती. मात्र याच तिसऱ्या आघाडीत भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर सामील झालेत. तसंच मनोज जरांगे पाटील देखील या आघाडीबरोबर येऊ शकतात. आणि त्यामुळेच आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडी पासून दूर राहणंच पसंत केलंय. जरांगे पाटलांच्या आरक्षणाबाबतच्या मागणीला आपला स्पष्ट विरोध असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. त्यामुळे जे पक्ष जरांगेंबरोबर जातील त्या पक्षांबरोबर आपण जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. त्यातच तिसऱ्या आघाडीत राजरत्न आंबेडकर असल्यामुळे या आघाडीत सामील न होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांकडे आणखी एक कारण आहे.
प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाण्याच्या चर्चांना ब्रेक लागल्यामुळे ते स्वबळावर लढतील असं वाटत होतं मात्र त्यांनी चौथ्या आघाडीसाठी पाया भरणी सुरू केली. या चौथ्या आघाडीमुळे नेमकी काय समीकरणं बदलतील पाहूया..
प्रकाश आंबेडकर यांनी रविकांत तुपकर यांच्याशी चौथ्या आघाडी बाबत प्राथमिक चर्चा केली आहे. तुपकर सोबत आल्यास त्यांच्या पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांचं मतदान वंचितकडे वळू शकतं. बुलढाण्यातून अपक्ष निवडणूक लढवूनही तुपकर यांनी अडीच लाख मत मिळवली त्यामुळे आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमधील निवडणुकीची समीकरणं बदलू शकतात. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आंबेडकर, तुपकर आघाडीचा फारसा प्रभाव दिसण्याची शक्यता नाही. त्यातच दोन्ही नेते प्राथमिक चर्चेच्या पुढे गेलेले नाहीत. त्यामुळे ही युती होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
चौथी आघाडी करण्याच्या विचारात असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आधीच 11 उमेदवार जाहीर केलेत. अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचा स्वतःचा मतदार आहे. त्यामुळे कोणत्याही आघाडी बरोबर जाऊन जास्त वाटाघाटी करण्यापेक्षा वंचित स्वबळाचा नारा देऊ शकतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमका कोणता निर्णय घेणार आणि त्या निर्णयामुळे मतांची समीकरणं कशी बदलतात हे येत्या काळातच कळेल.