जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध पॅरामोटर्स पायलट विजय सेठी यांच्यामुळे शितलचं हे स्वप्न पूर्ण झालं. लवकरच तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात येणार आहे.
स्कायडायव्हिंग करून वेगवेगळे विक्रम स्थापित करणाऱ्या शीतलचं मागील चार वर्षांपासून रात्रीच्या वेळी पॅरामोटर्सच्या साह्याने स्कायडायव्हिंग करण्याचं स्वप्न होतं. परंतु रात्रीच्या वेळी स्कायडायव्हिंग धोकादायक असल्याचं कारण दाखवून अनेक पॅरामोटर्स पायलटनी शीतलला नकार दिला. अखेर पुण्यातील उद्योगपती पॅरामोटर्सच्या साहयाने देशविदेशात वेगवेगळे रेकॉर्ड करणारे विजय सेठी यांच्याशी शीतलने संपर्क साधला. शीतलची जिद्द आणि तिची तीव्र इच्छा ओळखून सेठी यांनी तिला मदत करण्याचा निश्चय केला. त्यानंतर शीतलने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमध्ये हा पराक्रम केला. पॅरामोटर्सच्या साह्याने सेठी यांच्यासोबत ५ हजार फुटावर गेल्यानंतर शीतलने आकाशात झेप घेतली.
यावेळी शीतलने सांगितलं, खूप साऱ्या गोष्टी या हवेतील खेळामुळे आपण साध्य करू शकतो.पॅरामोटर्समध्ये अनेक स्पर्धा होत असतात मात्र आपल्या भारतात यावीषयी कोणाला जास्त माहिती नाही या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही काही खेळाडू तयार करून त्यांना पुढे स्पर्धेत उतरवू शकू असं मत शितलने व्यक्त केलं.पॅरामोटर्स पायलट विजय सेठी म्हणाले, तरुणांनी यात पुढे येऊन पॅराग्लायडिंग सेंटरला भेट द्यावी. ग्राउंडवर सराव करावा. हवाई खेळातील एक जुना खेळाडू म्हणून माझं पूर्ण योगदान असेल.