पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत आजपर्यंत एकूण २६४५ बॅग रक्त संकलन झाले आहे अशी माहिती सचिव सुरेंद्र वाईकर यांनी दिली आहे.
श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त सहयोगाने समाधी सोहळ्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. शनिवार दि. ९ एप्रिल रोजी अकराव्या रक्तदान शिबिरात भक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने तब्बल ३७९ बॅग रक्त संकलित करण्यात आले.
या शिबिराचे उद्दघाटन स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स कमांडेट तानाजी चिखले, डीसीपी सागर पाटील, एसीपी सतीश गोवेकर आणि श्रीमती सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राजेंद्र शिळीमकर, अध्यक्ष भगवान खेडेकर, सचिव सुरेंद्र वाईकर, सुरेश येनपुरे, नागराज नायडू, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
दिनांक १ मे ते ९ मे २०२२ या सप्ताहात सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होणार असून व दररोज संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भगवान खेडेकर यांनी दिली.
दुर्गाष्टमी निमित्त मठात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. समाधी ट्रस्ट तर्फे दिवसभर खिचडी प्रसाद व ताक वाटप करण्यात आले. संध्याकाळी पालखी सोहळा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.