अमरावती- तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे थांबलेली असताना काहीजण रेल्वेतून खाली उतरले आणि शेजारच्या ट्रॅकवरून भरधाव वेगात जाणाऱ्या रेल्वेखाली चिरडले. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस गाडी बुटवा गावाजवळ थांबली होती. बराच वेळ झाला गाडी थांबलेली आहे, हे पाहून या एक्स्प्रेसमधील काही प्रवासी हे गाडीतून खाली उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरेल्या प्रवाशांना शेजारील रेल्वे ट्रॅकवर एक भरधाव वेगानं गाडी जाणार आहे, याची जाणीवच नव्हती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सहा प्रवाशांनी जागीच आपले प्राण गमावले.
घटनेची माहिती मिळताच श्रीकाकुलमच्या पोलीस अधीक्षक जी. आर. राधिका या घटनास्थळी दाखल झाल्या. ‘आतापर्यंत सहा प्रवाशांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. या दुर्घटनेत आणखी काही लोक जखमी झाले आहेत का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे,’ अशी माहिती राधिका यांनी दिली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय एस जगनमोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला तातडीनं बचावकार्य करण्याचे आदेशही जारी करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांची नावं अद्याप कळू शकलेली नाही. दरम्यान, काही जण या जखमी झालेले असण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.