अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन
पुणे- मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे ही नाटकाशी संबंधित सगळ्या कलाकारंची जबाबदारी असते. कारण नाटक हे टीम वर्क असते. पुण्याचे प्रेक्षक चोखंदळ असून पुण्यात नाटक गाजले की, जगभरात गाजते. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुढी पाडवा या हिंदू नववर्षा निमित्त कलावंत साहित्य गुढीचे पूजन आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि डॉ. आशिष धांडे यांच्या हस्ते आणि पुण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख आणि पदाधिकारी तसेच ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील कलावंतांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी दामले बोलत होते.
यावेळी पुणे महानगर पालिकेतील शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष आणि संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संगीता बर्वे, नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख प्रकाश पारखी, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील मते, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे, अॅड. अर्चिता जोशी, समीर हंपी, सत्यजीत धांडेकर, प्रवीण बर्वे, दीपक गुप्ते, केतकी बोरकर, तसेच अभिनेत्री पौर्णिमा अहिरे, उदय लागू यांच्यासह ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील सगळे कलाकार उपस्थित होते.
यावेळी सावनी रवींद्र यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून ‘कौसल्येचा राम बाई’ या गीताच्या काही ओळी सादर केल्या. वर्षा उसगावकर, पृथ्वीराज सुतार, सुनीताराजे पवार, प्रकाश पारखी, निकीता मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजना मागील भूमिका विशद केली. सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.