मुंबई- राज्यभरात आज गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. आज एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अनेकजण हा सण साजरा करत आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले आहेत की, ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारनेही सर्व निर्बंध हटवलेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राची जनता सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पंढरपुरात वारकऱ्यांचा उत्साह दिसून येत आहे. विठुरायाचे बंद असलेले पायावरील दर्शन व्यवस्था आज गुढीपाडव्यापासून सुरु झाली आहे. या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे. आळंदीमध्ये देखील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठी नववर्षाची सुरुवात माऊलीच्या दर्शनापासून करण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदी येथील मुख्य समाधी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.