पिंपरी- २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी आज तिरडी आंदोलन केले. पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते.
थेरगाव,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कब्रस्तान संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पिंपरी चिचंवड महानगरपालकीचे आयुक्त राजेश पाटील यांना कब्रस्तान संघर्ष समिती कडून कब्रस्तानच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. काळेवाडी,थेरगाव ,वाकड परिसरात मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दफन करण्यासाठी जागाच नसल्याने मुस्लिम बांधवांच्या मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात येत होती.
वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनची उदासीनता दिसत असल्याने आज मुस्लिम बांधवांच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
हाजी गुलजार ,मौलाना अलीम अन्सारी, कारि इकबाल, मौलाना इस्लामुद्दीन उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, इंटकचे कैलास कदम, सतीश काळे, धनाजी येळकर, धम्मराज साळवे यांनी कब्रस्तानच्या मागणीसाठी आम्ही समिती सोबत असून त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना समनव्यक सिद्दीकभाई शेख म्हणाले, ” २१ वर्षांपासून प्रलंबित कब्रस्तानचा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पालिकेकडून मिळालेले आहे. कब्रस्तानचा विषय आश्वासन दिल्याप्रमाणे जलदगतीने न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले जाईल”
सदर आंदोलनाची दाखल घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कब्रस्तान संघर्ष समितीची बैठक घेऊन मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानचा प्रश्न सोडवण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे सांगितले. पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून सदरचे पत्र कब्रस्तान संघर्ष समितीचे समनव्यक सिद्दीकभाई शेख यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.