मुंबई- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गानक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर आता त्यांनी खानपान क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात त्या दिसणार आहेत. यामध्ये अमृता फडणवीस यांनी देवेंद्र यांच्याविषयीचे एक गमतीदार गुपित उघड केले आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे याच्या झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी भाग घेतला आहे. या भागाचे शूटिंग नुकतेच पार पडले असून यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. हा भाग आज (बुधवारी) रात्री साडेनऊ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
या कार्यक्रमात पत्नी सुगरण आहे की आई ? असा कोड्यात टाकणारा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यामुळे भल्याभल्यांची फिरकी घेणारे फडणवीसही बुचकळ्यात पडले. एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिले. लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर देवेन्द्रजी यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले.
अमृता फडणवीस यांनी एक तक्रार देखील केली. आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी सांगितले.