अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि नवाब मलिक यांचा राजीनामा हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांनी अभिभाषण दीड मिनिटांत उरकल्याने गाजला. तर आज दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षण आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्यानं भाजपकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.
पण या मुद्यावरून आक्रमक होताना आमदारांचं निलंबन होणार नाही याची काळजी घ्यावी असा कानमंत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
आजच्या दुसऱ्या दिवशी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यांवर प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि केंद्रीय पथकांच्या वापरासह केंद्रातील घडामोडींवर सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असणार आहेत. तर राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन यासह विविध मुद्यांवर विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे. ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याच अधिवेशनात निवडणूक होणार असं वक्तव्य केलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी पद्धतीनं व्हावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे या अधिवेशनात ही निवडणूक होणार का? आणि कशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.