राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांची नेमणूक तसेच ओबीसी आरक्षणाबाबत आज दोन्ही सदनात पारित केलेल्या विधेयकाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
नऊ मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी. याबाबतचे पत्र महाविकास आघाडी सरकारकडून याआधीच राज्यपालांना देण्यात आल आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली.ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेल्या सुधारित विधेयकामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी मध्यप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा करत आहे. याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात पारित झाले असून या विधेयकाबाबत राज्यपालांचीसोबत दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.