मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत.
घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे.