बीडमध्ये गुन्हेगारीचा कहर! महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी

345 0

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखांची खंडणी मागितली. सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंच महिलेचा पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विविध कारणं सांगून विकासकामांमध्ये सातत्याने अडथळे आणून खोट्या तक्रारी दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केल्याची तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहुयात..

या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे..आता महिला सरपंच मंगल मामडगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. आम्हाला कुठलेच काम करू दिले जात नाही. माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख, ज्ञानोबा देशमुख हे सातत्याने आमच्याकडे खंडणी मागतात. पैसे दिले तर तुला काम करू देणार नाहीतर काम करू देणार नाही अशी धमकी देतात. 11 जानेवारीला माझ्या मुलाला सायंकाळी पाच वाजता यांनी घरी बोलवून घेतले त्याला दम दिला. तुझ्या आईला सांग अर्धवट कामांवर सह्या करा नाहीतर तुझ्या आईला जेलमध्ये घालू असं धमकावलं. त्यामुळे मुलाने आपल्याला घरी येऊन राजीनामा देऊन टाक असं म्हटल्याचं मामडगे यांनी सांगितलं. तसेच माजी सरपंचाने शाळेच्या कामासाठी चार लाखाचा निधी आला आहे त्यातील एक लाख रुपये द्या अशी खंडणी मागितल्याचं देखील सांगितलं. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय द्या नाहीतर आम्ही आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. एकीकडे बीड गुन्हेगारीमुळे बदनाम होत आहे. त्यात अशा घटना समोर येत असल्याने त्यात आणखी भर पडत आहे. आता या घटनांना पायबंद कधी बसणार अशी विचारणाच बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!