यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ( तालकटोरा स्टेडियम ) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. सरहद पुणे संस्था या संमेलनाची आयोजक संस्था असून दिल्लीत होणारे हे संमेलन 70 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी मुंबई राज्य असताना 1954 मध्ये दिल्लीमध्ये 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते आणि या संमेलनानंतरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला व 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नुकताच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिजात मराठीचा हा ऐतिहासिक सोहळा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी तर स्वागताध्यक्ष शरद पवार असणार आहेत.
147 वर्षांपूर्वी न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पुण्याच्या हिराबागेत सुरू केलेल्या या संमेलनास अत्यंत उज्वल परंपरा आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेले देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन जाती धर्मात आणि राजकारणात विभागलेल्या मराठी माणसाला एकत्र आणणारे आणि राजधानीत मराठी माणसाची प्रतिष्ठा वाढवणारे करावे असा सरहद संस्थेचा प्रयत्न आहे. ही बाब सर्व मराठी जनांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असून राजधानी दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनास मराठी जनांनो उपस्थित राहा असं आवाहन 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सरकार्यवाह मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.