ठाणे – सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. या निमित्त आयोजित ‘लोकनाथ’ या गौरव समारंभात अभिनेता प्रवीण तरडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे रिटर्न गिफ्ट मागितले. शंभर टक्के क्षमतेने नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करावीत असे मागणे तरडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकनाथ’ गौरव समारंभ तसेच सत्कार समारंभ ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलीवुड अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, संगीतकार अवधूत गुप्ते, लेखक दिग्दर्शक विजू माने, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आमदार एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला अनेक लोकं गिफ्ट देतात आणि ज्याचा वाढदिवस असतो तो व्यक्ती लोकांना-मित्रांना रिटर्न गिफ्ट देतो. हाच संदर्भ धागा पकडून अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले, ” ‘मी संपूर्ण चित्रपट सृष्टीच्या वतीने आणि नाट्यसृष्टीच्यावतीने आपणास वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट मागतोय की, आजपासून पुढे लवकरात लवकर शंभर टक्के क्षमतेने नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करावीत आणि शंभर टक्के क्षमतेने प्रेक्षकांना बसण्यास परवानगी द्यावी.’ कारण आता आम्हा सर्व कलाकारांचा जीव गुदमरू लागलेला आहे. अनेक प्रतिभावंत आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे शंभर टक्के खुली होण्याची वाट पाहत आहोत.