अमरावती- अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर बुधवारी झालेल्या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्याने आयुक्तांवर दोन महिलांनी शाईफेक केली होती.
राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महापालिकेने एका रात्रीत हटवला होता. त्यावरून आमदार रवी राणा आणि महापालिका यांच्यातील वाद उफाळून आला होता. शिवप्रेमींमध्ये देखील तीव्र नाराजी निर्माण झाली होती. काल (बुधवारी) दुपारी मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. या उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साठत असल्याच्या तक्रारीवरून पाहणी करण्यासाठी आयुक्त आष्टीकर या ठिकाणी आले होते.
तेवढ्यातच दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला. त्याचंवेळी मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्यांना वाहनापर्यंत नेण्यात आले. या घटनेची माहिती समजताच महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी कामबंद करून मनपा समोर येऊन आंदोलन सुरू केले.
दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग ही या आंदोलनात सहभागी होतील.
काय म्हणाले आमदार रवी राणा ?
गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. महानगरपालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही. प्रशासनावरही दबाव आणला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.