राज्यातील अकरावी आणि बारावीच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये बेकायदेशीररित्या अतिरिक्त फी वसुली केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याच विरोधात अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात जोरदार निदर्शनं केली. त्याचबरोबर उपसंचालकांच्या खुर्चीला हार घालण्यात आला.
अकरावी, बारावीच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये अनेक महाविद्यालय अनुदानित कोट्यातील विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये फी उकळत असल्याच्या तक्रारी छात्रभारती संघटनेकडे आल्या होत्या. अशा काही महाविद्यालयांची चौकशी देखील शिक्षण विभागाकडून करण्यात आली मात्र संबंधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त फी परत करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर अशा महाविद्यालयांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर शिक्षण उपसंचालक या घटनेला गांभीर्याने न घेता कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केलं.
यावेळी शिक्षण उपसंचालक स्वतः उपस्थित नसल्याने इतर अधिकाऱ्यांनी सोमवार पर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक टीम तयार करून महाविद्यालयांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी
दिला आहे.