वनराज आंदेकर हत्याकांड केस मध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज यांच्या खुनात प्रत्यक्ष सहभागी असलेले सर्व आरोपी अटकेत आहेत. मात्र या प्रकरणात आरोपींमध्ये मध्यस्थी करणारा अर्थात आरोपींच्या मधला दुवा असलेला सर्वात महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय. ज्याचं नाव आहे प्रसाद बेल्हेकर.
प्रसाद बेल्हेकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह इतर चार गंभीर गुन्हे आहेत. त्याचबरोबर तो आंदेकर टोळीचे विरोधक असलेल्या सुरज ठोंबरे टोळीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बेल्हेकर याच्यावर आंदेकर टोळीतील ऋषभ आंदेकर याने हल्ला केला होता. त्याचाच राग डोक्यात असलेला बेल्हेकर हा आंदेकर टोळीचा बदला घेण्याच्या विचारात होता. दुसरीकडे बहीण संजीवनी कोमकर आणि तिच्या कुटुंबीयांशी आंदेकर कुटुंबीयांचे कौटुंबिक वाद सुरू होते. तर गुंड सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील निखिल आखाडे याचा खून आंदेकर टोळीनेच केल्याचा संशय असल्याने गायकवाड देखील आंदेकर टोळीच्या मागावर होता. त्यामुळेच आंदेकरांच्या या तीन विरोधकांची एकी झाली आणि वनराज आंदेकर यांच्या खुनाचा कट रचला गेला.
एकीकडे संजीवनी कोमकर आणि तिचे कुटुंब तर दुसरीकडे गुंड सोमनाथ गायकवाड.. दोघांनाही काटा काढायचा होता तो आंदेकर टोळीचा.. त्यामुळेच आधीपासून आंदेकरांविषयी राग असलेल्या प्रसाद बेल्हेकरने या दोन्ही आरोपींच्या मधला दुवा म्हणून काम केलं.
2023 च्या डिसेंबर महिन्यात संजीवनी कोमकरचा दिर गणेश कोमकर आणि गुंड सोमनाथ गायकवाड यांची बैठक झाली. त्यांच्या तीन ते चार बैठका बेल्हेकरने घडवून आणल्या. या भेटींमध्येच वनराज यांच्या हत्येचा कट शिजला. हल्ला करणाऱ्यांमध्ये असलेल्या अनिकेत दूधभाते, तुषार कदम, समीर काळे यांचा एकमेकांशी संपर्क करण्यासाठी बेल्हेकर मध्यस्थी होता. गणेश कोमकर आणि बेल्हेकर यांच्यातील व्हाट्सअप कॉल पोलिसांच्या हाती लागलेत. ज्याच्यातून मोठे धागेदोरे हाती येतील. तर वनराज यांचा खून झाल्यापासून बेल्हेकर हा फरार होता. त्याचाच शोध घेऊन अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
वनराज आंदेकर हत्याकांडातील सर्व आरोपींचे आपापले रोल ठरलेले होते. त्यानुसार आरोपींच्या मधला दुवा म्हणून बेल्हेकरने काम केले तर आरोपींना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी ही गणेश कोमकर याच्यावर होती. मुख्य सूत्रधार असलेल्या संजीवनी कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्यासह आता प्रसाद बेल्हेकर ला अटक करण्यात आली आहे. आंदेकर टोळी संपवायची असल्यास सर्वात आधी वनराजला संपवावं लागेल. हे आरोपींचं आधीच ठरलं होतं. त्या अनुषंगाने वनराज यांना संपवण्याचे प्लॅन आखण्यात आले मात्र तशीच संधी मिळाली नाही. ही संधी एक सप्टेंबरला मिळाली आणि त्याचाच फायदा घेत आरोपींनी वनराज यांना संपवलं. या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येत असून आणखी किती जणांचा यात समावेश आहे याचा तपास सुरू आहेत.