जुन्नर तालुक्यात शेतजमीनीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखील संदिप घोलप, (वय २०, रा.वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे खुन झालेल्या पुतण्याचे नाव असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल घोलप हा १ ऑगस्ट रोजी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील संदिप खंड घोलप यांनी ओतूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, सोमवारी (दि. १९) घोडेगाव येथील मावलया डोंगरावर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मारेकऱ्याचा शोध सुरू केला. तपासा दरम्यान त्यांना अभिषेक प्रकाश घोलप (वय.२३) व जितेंद्र पांडुरंग घोलप (वय. ३१, दोन्ही रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोघांनी चुलत पुतण्या असलेल्या निखिलचा खून केल्याची माहिती मिळाली.
खूनाचं कारण काय ?
मयत निखिल आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून शेतजमिन वही वाटीच्या कारणावरून वाद सुरू होते. गेल्या पाच सहा महिन्यांपासून निखिल घोलप हा देखील त्याचे वडील संदीप घोलप यांच्याप्रमाणे आरोपीच्या कुटुंबीयांना त्रास देत होता. त्याने अनेकदा आरोपीच्या घरच्यांना शिवीगाळ करत जमिनीवरून दमदाटी केली होती. त्याचाच बदल घेण्यासाठी या दोन्ही आरोपींनी निखिल ला संपवले. आंबेगाव तालुक्यातील फळोदे गावच्या हद्दीत गार मावलाया नावाचा मोठा डोंगर आहे. याच डोंगराच्या उतारावरील रस्त्यावर नेऊन निखिलच्या डोक्यात दगडाने मारून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर निखिलचा मृतदेह कोणाला दिसू नये यासाठी रस्त्याच्या खोलवर असलेल्या खड्डयात मृतदेह टाकून आरोपी प्रसार झाले. ही कबुली स्वतः आरोपींनी दिली आहे. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत.