महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरलेला असताना आणखी एक घटना समोर आली आहे. नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने माण तालुक्यातील दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली असून फिर्यादीच्या आधारावर नराधम बापास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब माळशिरस तालुक्यातील आहे. आरोपी वडील हा आपल्या दोन मुली व एका मुलाला घेऊन सोमवारी शिखर शिंगणापूर येथे देव दर्शनाला आला होता. दर्शन झाल्यानंतर त्याने आपल्या लहान मुलगी व मुलाला आइस्क्रीम घेऊन दिले. आईस्क्रीम खात एका ठिकाणी थांबायला सांगत स्वतः मात्र गाडीत पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने मोठ्या मुलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर शिंगणापूर- मार्डी रस्त्यापासून काही अंतरावर त्याने अल्पवयीन मुलीवर एका शेतात नेऊन अत्याचार केले. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने मोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केल्याने बाजूच्या शेतात काम करत असलेले शेतकरी तिच्या मदतीला धावले. व त्यांनीच या मुलीच्या नराधम बापाला पोलिसांच्या हवाली केले.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद नोंदवली असून आरोपी बापाला अटक देखील झाली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.