बलात्काराच्या गुन्ह्यामधील सहआरोपी असलेल्या महिलेचे नाव वगळण्यासाठी प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी पिडितेला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यात घडली आहे.
या प्रकरणी एका 29 वर्षीय पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पिंपरीमधील नेहरुनगरमध्ये राहणार्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारी 2023 रोजी फईम ऊर्फ फहिमुद्दीन नईम सय्यद यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्याचबरोबर या प्रकरणात सहभागी असल्या प्रकरणी एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही महिला मूळची सांगलीची असून तिला फईम याने पुण्यात बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. फिर्यादी महिलेने सांगितल्यानुसार तिचे व फईम याचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो महिलेकडे आहेत. 29 जुलै रोजी पीडित महिलेच्या दाजीच्या व्हॉटसअॅपवर महिलेचे व फईम यांचे प्रायव्हेट व्हिडिओ पाठवून वन टाईम व्ह्यु अशी सेटिंग केली होती. याप्रकरणी आरोपीची पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून पीडित महिलेच्या दाजींना धमक्या देत आहे. पीडित महिलेने दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा आणि या प्रकरणांमध्ये फईम पत्नीची आई देखील सह आरोपी असल्याने चुकीचे नाव मागे घ्यावे यासाठी फईमची पत्नी दबाव टाकत आहे. तक्रार मागे न घेतल्यास प्रायव्हेट व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी तिने अनेकदा दिली आहे.
आरोपीच्या पत्नीने एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेच्या गावातील मज्जिद मधील विश्वस्त लोकांना सांगून या गुन्ह्यातून आपल्या आईचे नाव मागे घेण्यासाठी सांगितले. त्यामुळे त्यांनी देखील मानसिक त्रास देऊन बदनामी केली असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.