मुलीला चालता येत नव्हतं, ती म्हणाली ‘दादाने हात लावला, मारलं’; बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीच्या आईने सांगितला काळजाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम
बदलापूर मध्ये साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील स्वच्छता कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने अत्याचार केले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र अजूनही हादरलेला आहे. अक्षय शिंदे ला फाशी व्हावी ही मागणी सुद्धा केली जात आहे. याच दरम्यान या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. असाच एक खुलासा पीडित मुलीच्या आईने केला आहे. जे ऐकून चीड आल्याशिवाय राहणार नाही.
आईने नेमकं काय सांगितलं
बदलापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या आईने त्या दिवशी नेमके काय घडले हे सांगितले. ’13 ऑगस्टला माझी मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. त्यानंतर मला शाळेतून फोन आला की ती खूप रडत आहे, तिला घ्यायला या. त्यावेळी मी माझ्या वडिलांना फोन करून तिला घेऊन यायला सांगितलं. माझे वडील तिला शाळेतून आणायला गेले. त्यावेळी ती खूप रडत रडत वर्गशिक्षकेला पकडूनच बाहेर आली. नेहमी मात्र ती एकटीच बाहेर येते. झालं नाही. बाहेर येता नाही तिला नीट चालता येत नव्हतं. शाळेत जाताना ती व्यवस्थित गेली होती पण परत येताना तिला चालताना त्रास होत होता. तिच्या आजोबांनी तिचा हात धरला होता तरीही तिला सरळ चालता येत नव्हतं. घरी आणल्यानंतर तिला रात्री खूप ताप आला. ती घाबरलेली होती. रडत रडतच मी शाळेत जाणार नाही असे म्हणत होती’, अशी माहिती मुलीच्या आईने दिली.
दरम्यान आपल्या मुलीला होत असलेला हा त्रास पाहून नेमकं काय करावं हे पालकांना समजत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी 14 ऑगस्टला तिला एका दवाखान्यात नेलं. प्राथमिक उपचार केले. मात्र त्याच वेळी या दुसऱ्या मुलीच्या पालकांनी या मुलीच्या पालकांना तिच्यासोबत शाळेत काहीतरी झालं आहे असं सांगितलं. मुलीने पालकांना काहीही सांगितलं नव्हतं मात्र यानंतर मुलीच्या वडिलांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी 15 ऑगस्ट ला पुन्हा एकदा दवाखान्यात जाऊन मुलीच्या तपासण्या केल्या. या तपासण्यांमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. मुलीच्या गुप्तांगात 1 सेंटीमीटरपर्यंत इजा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इतक्या भयंकर इजा सहजासहजी होत नाहीत, कुणीतरी काहीतरी चुकीचे केल्यामुळेच ही इजा होऊ शकते, असं देखील डॉक्टर म्हणाले. हे सगळं ऐकताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन प्रेमाने तिची चौकशी केली. त्यावेळी या मुलीने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या.
चिमुकलीने काय सांगितलं ?
मुलीची आई म्हणाली, ‘आम्ही तिला विचारलं, तुला काय झालंय ? कुठे दुखतय का ? तुला कोणी त्रास दिला का ? ते हात लावला का ?, त्यावर उत्तर देताना माझी मुलगी म्हणाली ही शाळेतला एक दादा आहे तुम्हाला हात लावतो. माझा फ्रॉक वर करतो. मला गुदूगुदू करतो, कधी कधी मारतो पण..’
हे ऐकताच मुलीच्या पालकांना जबर धक्का बसला. शाळेत आपल्या मुलीबरोबर इतकी गंभीर घटना घडली याचा त्यांना प्रचंड संताप झाला. तात्काळ त्यांनी शाळा प्रशासनाला याची तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनीही तक्रार लवकर घेतली नाही. बारा तासानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. आणि या प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.