पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात चक्क पोलीस कर्मचाऱ्यावरच कोयता गॅंग ने हल्ला केला आहे. यात पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
सहाय्यक पोलीस निरिक्षक रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये कोयता गॅंगच्या गुंडांनी धुडगूस घातला होता. दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होत होती. त्याचवेळी या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्य पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे त्या परिसरात गेले होते. या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच गुंडांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला.
हा हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव निहाल सिंह असे असून त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने या आधीही पोलिसांवर अशाप्रकारे हल्ले केले आहेत. तर निहाल बरोबर त्याचा साथीदार राहुल सिंह देखील त्यावेळी तिथेच होता. हा राहुल देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या दोघांकडे काही दिवसांपूर्वी अवैध पिस्तूल सापडले होते.
सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर होणारे हल्ले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुणेकरांची रक्षा करणाऱ्या पोलिसांच्याच जीवाला धोका असल्याने पुण्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.