पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झालेल्या आंदोलनात ‘सर तन से जुदा’ च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या धक्कादायक घटनेनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून पुण्यातील नागरिकांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनावेळी काही आंदोलकांकडून ‘सर तन से जुदा’ तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोषणाबाजीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्यानंतर बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महंत रामगिरी महाराजांविरोधात पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रकरणी जमाव जमवुन विनापरवानगी मोर्चा काढून, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन, समाजातील शांतता भंग करण्यासारख्या घोषणा दिल्या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्यामुळे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.