सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अंकुश नप्ते (वय 29, रा. करंदी, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार 31 जुलै 2022 पासून 29 ऑगस्ट 2024 दरम्यान घडला. याप्रकरणी पुण्यातील मॉडेल कॉलनी मध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत कारमध्येच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळ्या लॉजवर बोलावून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेकदा या तरुणीने नकार दिल्यानंतर ‘जर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्याशी लग्न करणार नाही’, अशी धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र त्यानंतर या तरुणी समोर आरोपीचा खरा चेहरा आला. जेव्हा तिला समजले की त्याचे आधीच लग्न झाले आहे. आणि ही गोष्ट त्याने तिच्यापासून लपवून ठेवली.
ही माहिती समजतात पिडीत तरुणीने आरोपीला याबाबत जाब विचारला. मात्र पुन्हा त्याने तिला भूलथापा मारून फसवण्याचा प्रयत्न केला. पत्नीशी पटत नसल्याने लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. तसेच या तरुणीला आपल्या गावी नेऊन आईवाडीलांशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ही तरुणी त्याच्या घरी पोहोचल्यावर आरोपीने आणि त्याच्या वडिलांने तरुणीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘माझी ओळख खूप वरपर्यंत आहे मी तुला खोटा केस मध्ये अडकविन, मला कोणी काहीही करू शकत नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर अखेर या तरुणीने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.