पुणे : पुण्यात (Pune Crime) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, रावडेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गावाचा विकास करत असल्याचा राग मनात धरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाची धारधार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. तसेच या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विशाल रावडे यांनी याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सचिन दिलीप रावडे (वय 32) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. सागर भानुदास रावडे, शशिकांत भानुदास रावडे, दिपक सदाशिव रावडे, सदाशिव रावडे, अमर सखाराम रावडे, उमेश ज्ञानोबा रावडे, ज्ञानेश्वर वामन रावडे, सोमनाथ उर्फ बाबु हनुमंत रावडे, दत्तात्रय वामन रावडे, सुंदराबाई सखाराम रावडे, सारिका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे सर्व (रा. गराडे, रावडेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
दि.29 रोजी फिर्यादी हे मौजे गराडे रावडेवाडी येथे सायंकाळच्या सुमारास नातेवाईकांच्या घरी आले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले त्यांच्या हातात तलवारी, चाकू, काठया, लोखंडी रॉड आणि महिलांच्या हातात मिरची पावडर होती. चारही महिला हातातील मिरची पावडर फिर्यादीच्या डोळ्यात टाकत असताना फिर्यादीने डोळे बंद केले. त्यावेळी सचिन दिलीप रावडे हा आल्याने आरोपी शशिकांत रावडे याने त्यास “तुला विशालचा लय पुळका आला आहे का? त्याला का वाचवतोस, तुला आता जिवंत सोडत नाही”, असं बोलून शशिकांत रावडे आणि बाळासाहेब रावडे हे मोठमोठयाने “मारा यांना, संपवून टाका”, असं म्हणाले. यानंतर आरोपीने हातातील धारदार तलवारीने सचिन दिलीप रावडे याच्या शरीरावर मागच्या बाजूला तलवारीने वार केला. “हाच विशालला वाचवतो आहे, याला संपवून टाका”, असं म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हातातील चाकूने सचिनवर वार केले.
हे घडत असताना सचिनला वाचवण्यासाठी गेलेले तानाजी रावडे, यश रावडे, ओंकार रावडे यांच्यावरदेखील आरोपींनी वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी विशाल रावडे आणि सचिन रावडे यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत माजवली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.