शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कल्याण मधील एका 13 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मुळे आत्महत्येचे कारण समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या चिकणीपाडा भागामध्ये विघ्नेश (वय. 13 ) आठवीत शिकणारा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहत होता. अनेक दिवसांपासून शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी त्याला चिडवत असल्याने तो मानसिक त्रासात होता. रविवारी त्याचे वडील कामावर गेले असता त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. वडील संध्याकाळी घरी आल्यानंतर विघ्नेशचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.
सुसाईड नोटमध्ये काय ?
या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटमध्ये लिहले आहे की, शाळेत कला शिक्षणाच्या शिक्षिका आणि इतर विद्यार्थी सतत त्रास देत असतात. त्यामुळे मी खूप वैतागलो आहे. शिक्षिका आणि एका विद्यार्थ्याने चिडवल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. आणि माझ्या बहिणीवर रागवू नका.’