एका तरुणीला भूतबाधा झाल्याची बतावणी करून तंत्र मंत्र करून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने तरुणीसह तिच्या कुटुंबातील इतर महिलांचे ही लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आई, मुलगी, मामी आणि चक्क साठ वर्षांच्या आजीवरही या नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना नागपूर मध्ये घडली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
17 वर्षीय अल्पवयीन तरुणी ही वारंवार आजारी असायची. हा भोंदू बाबा तिच्या वडिलांच्या ओळखीचा होता. वडिलांनी काळजीपोटी आपल्या मुलीच्या आजारपणा बाबत या बाबाला माहिती दिली. त्यानंतर तुमच्या मुलीला भूतबाधा झाली असून भूत पळवण्यासाठी 21 दिवस तिच्यावर तंत्र-मंत्राद्वारे उपचार करावे लागतील, असे त्याने सांगितले.
हीच पूजा करण्याच्या बहाण्याने या बाबाने या तरुणीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा त्याने भूतबाधा पूर्णपणे टळली नसल्याचे सांगून पुन्हा तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर काही दिवसानंतर मुलीच्या आईला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावरही अत्याचार केले. अशीच बतावणी त्याने तरुणीच्या मामीलाही केली. तंत्र मंत्रांची धार्मिक पूजा करण्याच्या बहाण्याने तिलाही गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावरही बलात्कार केला. या तरुणीची आई आणि मामी यांना त्याने छत्तीसगड, चंद्रपूर आणि डोंगरगाव या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. एवढे क्रूर कृत्य करूनही हा नराधम थांबला नाही. तर त्याने चक्क या मुलीच्या 60 वर्षांच्या आजीलाही भूल थापा मारून तिच्यावरही अत्याचार केले. हा सर्व प्रकार अडीच वर्ष चालू होता.
कोर्टाने सुनावली शिक्षा
दरम्यान या तरुणीला आपल्याबरोबर घडलेले अत्याचार लक्षात येताच तिने ही गोष्ट कुटुंबातील इतर महिलांना सांगितली. त्यावेळी कुटुंबातील इतर महिलांबरोबरही या बाबाने अत्याचार केल्याचे महिलांनी सांगितले. त्यानंतर या सर्व महिलांनी मिळून पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
तरुणीच्या फिर्यादीनुसार, धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय 50 रा. अंबेनगर, भांडेवाडी, नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. तसेच पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी या भोंदूबाबाला दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.