अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची आणखी एक घटना पुण्यात घडली आहे. काही दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरामध्ये अशाच पद्धतीने दरोडा असल्याचं भासवत पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केला होता. तशीच घटना कात्रज परिसरात घडली आहे. गोपीनाथ बाळु इंगुळकर (वय 37, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी मयत गोपीनाथ यांचा भाऊ संभाजी बाळु इंगुळकर (वय 44, रा. वृंदावन कॉलनी, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. तर भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी गोपीनाथ इंगुळकर (वय 32, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज) आणि नितिन शंकर ठाकर (वय 45, रा. कुरण, ता. वेल्हा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून या दोघांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत गोपीनाथ इंगुळकर हे मार्केटयार्डात हमालीचे काम करतात. त्यांना अनेक दिवसांपासून मधुमेहाची समस्या होती. 23 सप्टेंबर रोजी ते अचानक आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.
या प्रकरणी पत्नी राणी हिच्याकडे चौकशी केली असता आपले पती मधुमेहाच्या त्रासाला कंटाळले होते. मला जगायचं नाही, माझा गळा दाब असं म्हणत अनेकदा मला गळा दाबायला लावत होते. मधुमेहाच्या त्रासातून त्यांनी स्वतः स्वतःचा गळा दाबून आत्महत्या केली, असा बनाव तिने रचला. मात्र स्वतःचा गळा दाबून कुणीही आत्महत्या करू शकत नाही, त्यामुळेच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आणखी तपास केला. तपासातून राणी हिचे नितीन ठाकर याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राणीकडे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून चौकशी करताच आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत तिनेच पतीचा खून केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.