एन्काऊंटर… हा शब्द अगदी दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या तोंडूनही ऐकायला येतोय. त्या केस मधल्या आरोपीचं एन्काऊंटर झालं, अमुक टोळीचा मोरक्या एन्काऊंटर मध्ये मारला गेला, तो गँगस्टर एन्काऊंटर मध्ये ठार, एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस ऑफिसर… अशा हेडलाईन्स मधून हा शब्द वापरला जातो. पण या एन्काऊंटरचा अर्थ काय ? इतिहास काय? एन्काऊंटर का, कधी आणि कुणाचा केला जातो ? भारतात सर्वात पहिला एन्काऊंटर कोणाचा झाला ? चर्चेतले एन्काऊंटर कोणते ? याबाबतीत अनेकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यावरच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट
डिक्शनरी मध्ये एन्काऊंटर असा शब्दच खरं तर नाही. हा शब्द पोलिसांच्या बोली भाषेतून पुढे आला आहे. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा आरोपी, गुन्हेगार किंवा नक्षलवादी जेव्हा पोलिसांवर हल्ला करतो आणि स्वसंरक्षणार्थ पोलीस त्याच्यावर हल्ला करतात आणि त्यात आरोपीचा मृत्यू होतो याला एन्काऊंटर म्हणतात.
एन्काऊंटर हा शब्द भारतात साधारण 80 च्या दशकापासून प्रसिद्ध झाला. मात्र भारतातलं पहिलं एन्काऊंटर हे 1966 मध्ये अहमदनगरच्या संगमनेरमधील छोट्याशा गावातील गाव गावगुंडाचं झालं होतं. मात्र कुख्यात गॅंगस्टर मन्या सुर्वे हा गर्लफ्रेंड बरोबर आला असताना त्याचं एन्काऊंटर झालं. ‘आम्हाला मारायचं नव्हतं, तर त्याला पकडून, अटक करून न्यायापर्यंत पोहोचवायचं होतं. मात्र तिथे अशी काही परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे आम्हाला आमच्या संरक्षणासाठी गोळी चालवावी लागली’, असं एन्काऊंटर मधील पोलीस म्हणाले होते. आणि तेव्हापासूनच भारतात एन्काऊंटर हा शब्द प्रचलित झाला.
संगमनेर मधील छोट्याशा खेड्यात गावगुंड किसन सावजी याचं पहिलं एन्काऊंटर झालं ते वसंत ढुमणे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने केलं. तेव्हापासून कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वे वीरप्पन, इशरत जहा, दारासिंग, सोहराबुद्धीन शेख, लखन भैय्या, विकास दुबे, पुष्पेन्द्र यादव, तुलसी प्रजापती, आनंद पाल अशा अनेक एन्काऊंटरच्या केसेस भारतात गाजल्या. देशात गेल्या सहा वर्षात 813 एन्काऊंटर झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 34 इन्काऊंटर झालेत तर सर्वाधिक एन्काऊंटर हे छत्तीसगडच्या नक्षली भागामध्ये होतात. त्यानंतर गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब हैदराबाद महाराष्ट्र या राज्यांचा क्रमांक येतो. एन्काऊंटर झाल्यानंतर ते कोणत्या परिस्थितीत झालं, याचा तपास केला जातो. अनेकदा एन्काऊंटर फेक असल्यासही आढळून येतं. अशीच काहीशी परिस्थिती बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर मध्येही निर्माण झाली आहे.
एन्काऊंटरच्या या रक्तरंजित इतिहासात अक्षय शिंदेचे नाव जोडलं गेलंय. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वर कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे या एन्काऊंटर ची सखोल चौकशी होणार आहे. हैदराबादमध्ये बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचं एन्काऊंटर हे फेक असल्यास आढळल्यानंतर दहा पोलिसांवर 302 कलमाअंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणात दोषी आढळल्यास सर्व पोलिसांवर कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे तपासाअंती प्रकरणात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.