दोन मूकबधिर मुलांनी आपल्याच एका मूकबधिर मित्राचा खून करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून दादर रेल्वे स्थानकावर आणल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्शद अली सादिक शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर बॅग घेऊन स्थानकावर आलेल्यांपैकी एकाचे नाव शिवजीत सिंह तर दुसऱ्याचे जय चावडा असे आहे. आरोपी आणि मयत हे एकमेकांचे मित्र होते. ते मुंबईत वास्तव्यास होते. दोन्ही आरोपींनी मयत अर्शद याला रविवारी आरोपी जय चावडा याच्या घरी बोलावले. तिघांनीही एकत्र बसून मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाले. याच वादाच्या रागातून जय चावडा आणि शिवजीत सिंग यांनी अर्शद अलीची हत्या केली, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. तर हे दोघेही आरोपी आपला जबाब बदलत असल्याचे समोर आले आहे.
या दोघांनी सुरुवातीला एका मुलीच्या प्रकरणातून अर्शदची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन लाख रुपये देणे असल्याच्या वादातून हत्या केल्याचे सांगितले. त्यामुळे हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र त्यांनी ही हत्या कशी केली याबाबतची माहिती आता समोर आली आहे. सुरुवातीला अर्शदचे हात बांधून त्याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणी दरम्यान शिवजीतने एका मुलीसह इतर दोघांना व्हिडीओ कॉल केला होता. काही वेळाने शिवजीतने अर्शदला नग्न करुन मारायला सुरुवात केली. त्यावेळी अर्शद त्याच्याकडे दयेसाठी विनवणी करत होता. त्यावेळी व्हिडीओ कॉलमधील एक व्यक्त्ती तिसऱ्या मूकबधिर व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून मारहाणीची घटना दाखवत होती. ती त्यांच्यातील मुलगी देखील अर्शदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहन देत होती. यास व्हिडिओ कॉलमधील एक व्यक्ती दुबईत असून हत्येची मास्टरमाइंड देखील असल्याचा आरोप अर्शदच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे व्हिडीओ पोलिसांनी मिळवले असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.