दोन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील खामगावमध्ये एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. याप्रकरणी संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ माजलेली असताना ही हत्या नेमकी का करण्यात आली हे उघड झाले आहे.
सुरज राहूल भुजबळ (वय.२३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमित जयवंत बहिरट (वय.२४) याने आपल्याच पत्नीच्या भावाचा म्हणजेच मेहुण्याचा खून केला. सुरज हा अमितचा मेहुणा होता. कौटुंबिक वादातून त्याने सुरजचा खून केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरजची बहिण संजना हिचा अमित बहिरट याच्याशी दिड वर्षांपुर्वी प्रेम विवाह झाला होता. अमितला दारूचे व्यसन असल्याने तो संजनाला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होता. त्याच्या या त्रासाला वैतागून संजना अखेर माहेरी आली. संजनाने अमित विरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांसह बैठक बसली. या बैठकीत अमितने संजनाला सोडचिठ्ठी देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. त्याचबरोबर मी संजनाला सोडचिठ्ठी तर देणारच नाही पण तुझ्या मुलाचे तुकडे तुकडे करेन’, अशी धमकी त्याने संजनाच्या आईला दिली होती. मात्र तो खरंच असे काही करेल, अशी अपेक्षा त्यांना नव्हती.
3 ऑगस्ट रोजी सुरज हा त्यांच्या कपड्याच्या दुकानात बसला होता तेव्हा त्यावेळी अमित आणि त्याचा भाऊ समीर आले. व धारदार शस्त्रांनी सुरजचा खून केला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तक्रार नोंद केली. तसेच अमित बहिरट आणि समीर बहिरट या दोघाही भावांना अटक करण्यात आली आहे.